मुंबई : विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या घटनांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो, अशीच एक नवी घटना समोर आली आहे. या पीडित तरुणीला विदेशातून भारतात आणण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, एपीआय धनराज चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले होते, त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी गुन्हे शाखेचे आभार व्यक्त केले आहे. पिडीत तरुणी ही नॉर्थ गोव्याची रहिवाशी आहे. तिला सुरेशकुमार आणि कादर नावाच्या दोन एजंटने बेहरीनला नोकरीसाठी पाठविले होते. १७ फेब्रुवारी २०२३ ला बेहरीनला गेल्यानंतर तिला तिथे घरकामासाठी प्रवृत्त करण्यात आले होते.
मोबाईल चोरीचा खोटा आरोप : तिने घरकाम करण्यास नकार दिला होता. तयामुळे तिच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा खोटा आरोप करुन पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. हा प्रकार तिच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी मुंबई पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या युनिट दहाकडे संबंधित प्रकरण पाठवून दिले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, एपीआय धनराज चौधरी यांनी संबंधित दोन्ही एजंटसह बेहरीन येथील भारतीय दूतावास कार्यालयातील अधिकार्यांशी संपर्क साधून तिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.