मुंबई - सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा बँकेतील कामकाजावर परिणाम झाला आहे. वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी ऑनलाइन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग, वीजबिलांचे वाटप तसेच वीजबील भरणा केंद्र सुरू केले आहे.
जूनमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रिडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे. ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटवला जाईल त्याच तारखेला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बँका बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटवण्यास उशीर होत आहे.