मुंबई - सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या युद्धजन्य परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर, पारिचारिका तसेच एकूणच आरोग्य विभागाचे नियोजन पाहणारे आरोग्य विभागातील अधिकारी हे खऱ्या अर्थांनी देवदूत म्हणून काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या तसेच आरोग्य खात्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची राहण्याची सोय व्हावी म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वतःचे हॉटेल प्रशासनाला वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील आपले 'विहंग्ज इन' हे हॉटेल पूर्णपणे डॉक्टर व आरोग्य खात्यातील लोकांना राहण्यासाठी देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य सेवेतील डॉक्टर, पारिचारिका व इतर अधिकारी हे दिवस रात्र काम करीत आहेत. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. जे कोरोनाग्रस्तांची सेवा करतात त्यांची चांगली सोय व्हावी किंवा त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी स्वतः आमदार प्रताप सरनाईक गेले काही दिवस लक्ष ठेऊन आहेत.
प्रताप सरनाईक यांचे ठाणे घोडबंदर रोडवर 'विहंग्स इन' हे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये 3 बँकवेट हॉल व राहण्याच्या 32 रूम आहेत. हे हॉटेल आरोग्य विभागासाठी आपण देण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर व आरोग्य विभागातील व्यक्ती यांना राहण्यासाठी हे हॉटेल पूर्णपणे विनामूल्य देत असल्याचे आमदार सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.
कोरोनामुक्ती पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आरोग्य खाते काम करीत राहणार आहे. आरोग्य खात्याला गरज असेल तोपर्यंत आपले हॉटेल आपण त्यांना देत आहोत, असेही सरनाईक म्हणाले.
ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची सेवा करणारी आरोग्य यंत्रणा यांना जे जे सहकार्य लागेल ते सगळे केले जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. दिवस रात्र आरोग्य खाते काम करत आहे. संचारबंदी असल्याने रात्री अपरात्री, अवेळी कर्तव्य बजावून या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या घरी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टर व आरोग्य खात्यातील कर्मचारी यांच्या राहण्याची सोय या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.