मुंबई- कोरोना काळ सुरू झाल्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास बंद आहे. अशावेळी मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) मात्र सर्वांसाठी खुली असून वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे. त्यात आता मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने या प्रवाशांना आणखी एक दिलासा दिला आहे. उद्यापासून(सोमवार) मेट्रोच्या सेवेच्या वेळेत 40 ते 45 मिनिटांची वाढ होणार आहे. एकार्थाने मेट्रो एकच्या फेऱ्या वाढणार आहेत. आतापर्यंत सकाळी साडे आठपासून सुरू होणारी मेट्रो 1 आता 7.50मिनिटांनी सेवेत दाखल होणार असून रात्री 9.15 ला शेवटची मेट्रो 1 सुटणार आहे.
रोज 50 हजार प्रवासी करताहेत प्रवासी-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून मेट्रो 1 ची सेवा बंद होती. पुनश्च हरीओम म्हणत मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी का होईना पण लोकल सुरू झाली आहे. हळूहळू एक-एक घटकाला त्यात प्रवेश मिळू लागला. पण मेट्रो 1 काही ट्रॅकवर येत नव्हती. दरम्यान एमएमओपीएलकडून मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो 1 च्या सेवेत, गाड्यांमध्ये आवश्यक ते बदल करून ठेवण्यात आले होते. एमएमओपीएलला प्रतीक्षा होती, ती केवळ राज्य सरकारच्या हिरव्या कंदिलाची. अखेर हा हिरवा कंदील ऑक्टोबरमध्ये मिळाला आणि 19 ऑक्टोबर पासून मेट्रो 1 मुंबई करांच्या सेवेत दाखल झाली.
गुडन्यूज..! उद्यापासून मेट्रो-1 च्या वेळेत 40 ते 45 मिनिटांनी वाढ
मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी दिसाला देणारा मेट्रोने घेतला आहे. मेट्रोच्या सध्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्यामध्ये वाढ होणार आहे. कोरोना काळात लोकल प्रवासाला सर्वसामान्यांना बंदी असली तरी घाटकोपर ते वर्सोवा प्रवास करणाऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे.
सर्वसामान्यांसाठी, सर्व प्रवाशांसाठी मेट्रो 1 सुरू झाली तरी सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळेच आज दिवसाला सुमारे 50 हजार प्रवाशी मेट्रो 1ने प्रवास करत असल्याची माहिती एमएमओपीएलने दिली आहे.
उद्यापासून वेळेत 'अशी' वाढ
19 ऑक्टोबरपासून मेट्रो 1 सेवेत दाखल झाली आहे. कोरोना काळ लक्षात घेता एमएमओपीएलने सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा की सकाळी साडे पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो 1ची सेवा सुरू असते. दरम्यान कोरोना काळात खबरदारी म्हणून वेळ कमी ठेवत पुढे प्रवाशांचा प्रतिसाद आणि कोरोना परिस्थिती लक्षात घेत वेळ वाढवण्याचा एमएमओपीएलचा विचार होता. त्यानुसार अखेर आता उद्यापासून सकाळी 40 तर रात्री 45 मिनिटांनी सेवेची वेळ वाढवण्यात आली. त्यानुसार आता सकाळी वर्सोव्यावरून 7.50 ला तर घाटकोपरवरून 8.15 ला पहिली मेट्रो गाडी सुटेल. तर शेवटची गाडी घाटकोपरवरून 9.15 तर वर्सोव्यावरून 8.50 ला सुटेल.