मुंबई:जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं शिष्टमंडळ आज पोहोचणार होते. संध्याकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे पोहोचणार अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्री मुंबईतील त्यांच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे शिष्टमंडळ आंदोलकांची उशिरा भेट घेणार अशीही चर्चा सुरू झाली.
नेते पोहोचले विमानतळावर-आंतरवाली सराटी येथे जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वात आधी विमानतळावर पोहोचले. त्यापाठोपाठ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, तसेच दानवे विमानतळावर पोहोचले. या मंत्र्यांनी विमानतळावरील अतिथिगृहात साधारण दोन ते अडीच तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची वाट पाहिली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळावर पोहोचले नाहीत. काही वेळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली. अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली गाडी लावण्यास अंगरक्षकांना सांगितले. त्यानंतर एकेक मंत्री निघून गेले.
आंदोलकांची भेट टाळण्याची काय आहेत कारणे- विमानतळावर जमलेल्या मंत्र्यांनी बराच वेळ चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचणार नाहीत, हे लक्षात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणात आंदोलकांची भेट टाळणं आवश्यक असल्याचे कारण देण्यात आले. तर सध्याच्या परिस्थितीत आंदोलकांची भेट घ्यायला जाणे उचित नसल्याचं गृह विभागामार्फत कळविण्यात आल्याचं सांगण्यात आलें. वास्तविक गृह विभाग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजस्थानमध्ये असल्यामुळे शिष्टमंडळासोबत जाणे शक्य नव्हते.
श्रेय वादाच्या लढाईत मराठा वंचित-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळात सोबत उपस्थित राहून आंदोलकांची भेट घेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मराठा आंदोलकांची भेट घेतली असती तर आंदोलन मिटले असते. तर त्याचे सर्व श्रेय त्यांना मिळाले असते. त्यामुळेच ही भेट रद्द करण्यात आली असावी अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. एकूणच मंत्र्यांच्या आणि पक्षांच्या या श्रेयवादाच्या लढाईत आरक्षणासाठी आंदोलन करणारा मराठा समाज पुन्हा एकदा वंचितच राहिला असल्याचे गायकवाड यांनी म्हटलयं.
हेही वाचा-
- Maratha Reservation: रात्री उशिरा जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद...एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना काय सांगितलं?
- Maratha Kranti Morcha: नांदेडात मराठा आंदोलक आक्रमक; संतप्त आंदोलकांनी मालेगाव-नांदेड रस्त्यावर पेटवली बस