मुंबई- मराठा क्रांती मोर्चाचे २६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मुंबईच्या वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर गेल्या दीड महिन्यात राज्य सरकारने कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे, मराठा समाज शैक्षणिक व नोकरीतील संधीपासून वंचित राहिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत सरकार कोणतीही पाऊले उचलताना दिसत नाही. १२ हजार पदांची पोलीस भरती आणि ९ हजार ऊर्जा खात्यातील नोकऱ्या जाहीर करून सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तो पर्यंत नोकर भरती करू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, २७ ऑक्टोबरला सुनावणी
आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. जर निकाल सरकारच्या बाजूने लागला नाही, तर सरकारने याबाबत काय तयारी केली, याची माहिती मराठा समाजाला देण्यात आलेली नाही. मराठा समाजा संदर्भात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळाचे आर्थिक पाठबळ वाढवण्याची घोषणा झाली. पण पुढे कार्यवाही झालेली नाही. सर्व जिल्ह्यात वसतिगृह बांधण्याची घोषणाही कागदावरच राहिली. यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी असून ती सोमवारच्या आंदोलनात व्यक्त होईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क घालून हे आंदोलन होईल. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार यांनी दिली.
हेही वाचा-पहिल्यांदाच बंदिस्त सभागृहात होणार शिवसेनेचा दसरा मेळावा, सोशल मीडियावरून प्रसारण