मुंबई -मुंबईसह राज्यात कॊरोनाची दुसरी लाट सुरू असताना सरकारी रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आपल्या अनेक मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. आपल्याला सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणी संदर्भात उद्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर 29 एप्रिलपासून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला आहे. आज राज्यातील आरोग्य यंत्रणावरील ताण वाढला असताना असे झाल्यास आरोग्य यंत्रणेपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
...अन्यथा 29 एप्रिलपासून काम बंद आंदोलन! सरकारी रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारा
आपल्याला सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणी संदर्भात उद्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर 29 एप्रिलपासून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला आहे.
‘या’ आहेत मागण्या -
राज्यातील 19 सरकारी रुग्णालयात 400 ते 450 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (प्राध्यापक/डॉक्टर) आहेत. हे डॉक्टर कॊरोना काळात वर्षभर झाली सेवा देत आहेत. हे डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी वर्षभर करत आहेत. तर वेतन निश्चिती आणि इतर भत्ते मिळावेत अशाही त्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी ते सर्व स्तरावर पाठपुरावा करत आहेत. यासाठी आंदोलने ही केली आहेत. मात्र, त्यांना नेहमी कोरडी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे आता मात्र हे डॉक्टर पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
15 एप्रिलला घेतली होती वैद्यकीय शिक्षण मंत्र्याची भेट
कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, यासाठी कंत्राटी डॉक्टरांनी 15 एप्रिलला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उद्या होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही तर 29 एप्रिलपासून काम बंद आंदोलनावर जाण्याचा या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.