◾️ आंबेघर ता. पाटण येथे एनडीआरएफकडून बचावकार्य सुरुच ...आतापर्यंत पाच मृतदेह मिळाले
MH Flood Live Updates : मुख्यमंत्री महाडमध्ये पोहोचले; तळईतील दुर्घटना स्थळाची करणार पाहणी
13:32 July 24
12:05 July 24
महाडमधील दुर्घटना स्थळाची मुख्यमंत्री करणार पाहणी
मुंबई - महाडमधील तळई गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. दुपारी १२ वाजता, मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळई गावाकडे निघणार आहेत. दुपारी १.३० वाजता तळई येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. यानंतर दुपारी ३.२० वाजता हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून देण्यात आली.
12:05 July 24
महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
12:02 July 24
यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या निंगणुर या गावाजवळून वाहणाऱ्या मोठा नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक शेतमजूर युवक वाहून गेल्याची उघडकीस आली. हे तिघे मजूर मानवी साखळी करून नाला पार करीत होते. स्थानिक नागरिकांनी नाल्यातून पोहून फुलसावंगी पर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, पुरात वाहून गेलेला युवक आढळून आला नाही. ही घटना शुक्रवारी 23 जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली.
केळी तोडण्यासाठी आला होता मजूर
मराठवाड्यातील माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील शेख कलीम शेख खाजा (32) हा निंगणूर येथील दादाराव गव्हाळे यांच्या शेतात केळी तोडण्या करिता मजुरीने आला होता. शेतातून परतताना नाल्याला आलेल्या पुरातून जाण्यासाठी पोहणे येत नसल्याने त्याच्या समवेत असलेल्या दोन मजुरांसमवेत हाताची साखळी करून नाला ओलांडत असताना इतर दोन मजुरांच्या हातातून हात सुटल्याने शेख कलीम हा वाहून गेला. तो हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रहिवासी असून सध्या माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे राहत होता. तेथील फ्रुट व्यापार्याच्या कंपनी तो काम करत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच, तत्काळ प्रशासनाने शोधकार्य सुरु केले असून कलीमचा अद्याप पत्ता लागलेला नाही. शोध कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी दिली आहे.
12:01 July 24
चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाचं महापुराने मोठं नुकसान
चिपळूणच्या महापूराचा फटका चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकालाही मोठा बसला आहे. जवळपास 15 ते 20 फूट पाणी या बसस्थानकात होतं. 30 तासाहून अधिक वेळ या ठिकाणी पुराचं पाणी होतं. या ठिकाणच्या सर्व आस्थापना पाण्यात होत्या. सध्या पूर ओसरला आहे. मात्र, चिखलाचं साम्राज्य या ठिकाणी आहे. आगाराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दरम्यान, बस स्थानकातील छोट्या दुकानदाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपंग असलेल्या प्रवीण साळवी यांचं मोबाईल कव्हर, रिचार्जचं याठिकाणी गेली 22 वर्ष छोटंसं दुकान आहे. 22 वर्षांत त्यांनी एवढा पूर पाहिला नव्हता. मात्र, त्यांच्या 22 वर्षांच्या मेहनतीवर पुराने पाणी फेरलं असून आता त्यांचा जगण्याचा संघर्ष पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.
12:01 July 24
कोयना धरणात 87 टीएमसी पाणीसाठा
कोयना धरणात शनिवारी सकाळी ८ वाजता 87.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी 655.66 मीटर इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणात प्रति सेकंद सरासरी 1,19,726 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा वीजगृहातून एकूण 48,576 क्युसेक प्रति सेकंद विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 204 मिलिमीटर, नवजा येथे 207 मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 287 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणाचे दरवाजे १२ फुटांवरून १० फुटांवर आणण्यात आले आहेत. परिणामी कोयना आणि कृष्णा नदीकाठाला मोठा दिलासा मिळाला आहे.
11:59 July 24
अलमट्टी धरणातून ३,५०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता
कराड (सातारा) - कोयना धरणाचे दरवाजे आज सकाळी १२ फुटांवरून १० फूट करण्यात आले आहेत. धरणातून कोयना नदी पात्रात होणारा विसर्ग आणि पावसाचा जोरदेखील कमी झाला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णाकठाला तूर्तास दिलासा मिळाला आहे. कराड तसेच तांबवे (ता. कराड) येथील पूरदेखील ओसरू लागला आहे. कराडमध्ये रात्रभर पावसाने विश्रांती घेतली. तसेच तीन दिवसानंतर कराडकरांना आज सूर्यदर्शन झाले. आज अलमट्टी धरणातून ३,५०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास कराड आणि सांगली शहराला मोठा दिलासा मिळेल.
11:56 July 24
पुणे जिल्ह्यातील 420 गावांना फटका
हवामान विभागाने 22 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. 21 जुने ते 20 जुलै या कालावधीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील 420 गावांना बसला. यातील 10 गावांना पूर्णतः तर 410 गावांना अंशतः फटका बसला. गावात, घरात पाणी शिरल्यामुळे मावळ तालुक्यातील 133 कुटुंबातील 398 व्यक्तींचे, मुळशी तालुक्यातील 10 गावातील 40 व्यक्तींचे तर भोर तालुक्यातील 33 कुटुंबातील 163 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. या कुटुंबातील व्यक्तींचे जिल्हा परिषद शाळांमध्ये, डोंगरावर असणाऱ्या गावात, आरोग्य केंद्रांमध्ये आणि नातेवाईकांच्या घरांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते.
11:55 July 24
भोर तालुक्यातील मौजे आंबवडे गावातील मोहन अमृत घोरपडे (वय 27) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोल्ट्रीमध्ये लिफ्टिंग करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुळशी तालुक्यातील 6 पशुधनचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मुळशी, जुन्नर, खेड, मावळ, भोर तालुक्यातील 40 घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 95 विद्युत खांब आणि दोन रोहित्राचे देखील नुकसान झाले आहे. याशिवाय शेती पीक व फळपिकांचे देखील कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
- शेती पिकांचे नुकसान
- जिरायती पिके बाधित क्षेत्र हेक्टर - 3134.3
- बागायती बाधित क्षेत्र हेक्टर - 49
- एकूण बाधित क्षेत्र हेक्टर - 3183
- एकूण बाधित शेतकरी संख्या - 9993
11:47 July 24
एनडीआरएफच्या बचाव कार्याचे कोल्हापुरातील दृश्ये
10:25 July 24
सांगली - जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोल्हापूर महामार्ग बंद आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेठ नाका येथे थांबलेल्या वाहनाचलकाने सांगितले की, आम्ही येथे रात्रीपासून अडकलो आहोत. इथे मोबाईल नेटवर्क नाही. तसेच आम्ही इथे चहासुद्धा घेऊ शकत नाही.
09:31 July 24
राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी, दरड कोसळल्याच्या घटनेत कालपासून (शुक्रवारी) आतापर्यंत तब्बल 76 जणांचा मृत्यू झाला आहे.
08:50 July 24
कोयनेतून विसर्ग कमी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू
कोयना धरणाचे दरवाजे बारा वरून दहा फुटांवर विसर्गही केला कमी. कराडमध्ये रात्रभर पावसाची विश्रांती. आज सकाळी नऊपासून अलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता. कराडसह सांगलीला मिळणार दिलासा...
08:48 July 24
पोलादपूरमध्ये 10 जणांचा बळी, 22 जखमी
मौजे केवनाळे ता. पोलादपूर येथेही अतिवृष्टीमुळे दरड कोसळून 5 व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधण्यात आले. या घटनेत 6 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. जखमी व्यक्तींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत.
मौजे साखर सुतारवाडी (ता.पोलादपूर) येथे 6 व्यक्तींचा मृत्यू झाला. तर 1 व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. इतर 16 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत.
08:44 July 24
रायगड दरड दुर्घटनेत 42 मृतदेह हाती, 43 बेपत्ता, बचावकार्य सुरू
मौजे तुळई (ता.महाड) येथे दरड कोसळून 85 व्यक्ती अडकल्या आहेत. बचाव कार्याच्या माध्यमातून 42 मृतदेह हाती आले आहेत. अद्यापही 43 व्यक्ती बेपत्ता आहेत. मौजे तुळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोध कार्य अद्यापही सुरू आहे.
08:40 July 24
कोल्हापुरात अतिवृष्टीचा 262 गावांना फटका, 5 जणांचा मृ्त्यू
कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापुरातही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तब्बल २६२ गावांना पुरांचा फटका बसला आहे. यामुळे एकूण ९९१७ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये ४०८८२ नागरिकांचा समावेश असून १५२९६ जनावरेही सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे 5 जीवितहानी झाली असून यात राधनागरी-२, चंदगड २, कागल-१ मधील एकाचा मृत्यू झाला आहे. पशुहानी-शाहूवाडी तालुक्यातील सावरडी येथे भुसखलन होऊन दोन जनावरे गाडली गेली आहेत. मलकापूर येथून एक म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
08:37 July 24
अतिवृष्टीचा पुणे जिल्ह्यातील 420 गावांना फटका
पुणे - गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावासाने राज्यात हाहाकार उडवला आहे. त्याच प्रमाणे या अतिवृष्टीचा पुणे जिल्ह्यातील 420 गावांना फटका बसला आहे, या पावसामुळे जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू, तर 6 जनावरे दगावली आहेत. तसेच अनेक घरांची पडझड झाली असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
08:36 July 24
सांगली - कृष्णा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
सांगलीत पाणी पातळी पोहचली 49 फुटांवर पोहोचली असून शहरातील बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे. याच बरोबर टिळक चौक आणि मारुती चौकात देखील पुराच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. या ठिकाणी एनडीआरएफ पथक बचाव कार्यासाठी सज्ज असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
07:54 July 24
पोलादपूर तालुक्यातील केवनाळे या गावातही येथेही अतिवृष्टीमुळे दरड कोसळून 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतदेह प्रशासन व पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 6 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. जखमी व्यक्तींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर साखर सुतारवाडी येथेही 5 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. इतर 16 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत.
07:52 July 24
रायगड दरड दुर्घटना -
तळई (महाड) येथे दरड कोसळल्याच्या घटनेत 85 व्यक्ती अडकल्या आहेत. त्यापैकी 23 जुलैच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 38 मृतदेह आढळले असून अद्यापही 47 व्यक्ती बेपत्ता आहेत. तळई गावाची लोकसंख्या 241 इतकी आहे. त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेरच्या होत्या. त्यात 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोध कार्य अद्यापही सुरू आहे.
07:25 July 24
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये एनडीआरएफकडून बचावकार्याला पुन्हा सुरुवात
07:21 July 24
कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले. यावेळी एनडीआरएफच्या पथकाकडून अन्न वाटप करण्यात येत आहे.
06:55 July 24
पुणे, रत्नागिरी आणि गोवा या भागातील जवळपास 170 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भुवनेश्वर येथून एक C-17, दोन C-130Js आणि 21T हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहे.
06:55 July 24
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाच्या (ndrf) 26 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
06:39 July 24
पुढील काही तासात हिंगोली, जालना, रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
06:31 July 24
दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड कोसळलेल्या रायगड जिल्ह्यातील तळई या गावी काल (शुक्रवारी) भेट दिली. 33 मृतदेह शोधण्यात आले असून 52 जण बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच बचाव कार्य सकाळपर्यंत थांबवत आहोत. या दुर्घटनेत 32 घरांचे नष्ट झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाच्या वतीने केला जाणार आहे.
06:14 July 24
मुंबई - राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शुक्रवारी) दिली. आणखी एक-दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.