मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. मात्र अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना पचली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडल्याची खोचक टीका राज ठाकरेंनी केली.
काय म्हणाले राज ठाकरे :आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृष्यातील दिगू टिपणीस झाला, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले. यामध्ये उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला :राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाचा आता चिखल झाल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत राज ठाकरे यांनी लिहिताना 'ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.