मुंबई- कुपोषित बालकांच्या वर्गीकरणासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या पोषण ट्रॅकर यंत्रणेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा, महिला व बाल विकास विभागाने केला आहे. अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती याद्वारे संकलन केली जाते.
महाराष्ट्र अग्रेसर
देशातील कुपोषित मुलांच्या माहितीसाठी केंद्र शासनाने ट्रॅकर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मुलांची उंची, वजनाद्वारे कुपोषित, अति तीव्र कुपोषित व सुपोषित वर्गीकरण केले जात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने 9 मार्च ते 9 सप्टेंबर, 2021 रोजीच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंग मिटींगवेळी दोष दूर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. महाराष्ट्र शासनाने यावेळी यंत्रणेतील त्रुटी केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानुसार केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ॲप तयार केले. या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या सूचना केल्या. संगणक प्रणालीद्वारे मुलांची माहिती गोळा केली जाऊ लागली. 10 नोव्हेंबर 2021 रोजी आकडेवारीनुसार पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तीव्र कुपोषित 6 हजार 760, अति तीव्र कुपोषित 6 हजार 526 मुलांची संख्या असल्याचे महिला व बालविकास विभागाचे म्हणणे आहे.