मुंबईLadli Bahna Yojana :नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात एकहाती विजय मिळवलाय. विशेषत: मध्य प्रदेशातील विजयाची जोरदार चर्चा रंगली असून या विजयामागं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लाडकी बहना योजना असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत लाडली बहना योजनेचा वापर करण्यात आला असून भाजपाला मोठा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता महाराष्ट्रात देखील अशीच योजना राबवण्याचा सरकारचा मानस आहे. याआधी सरकारनं महिलांसाठी लेक लाडकी योजनाही सुरू केली आहे. मात्र, लाडली बहनासारखी योजना राज्यात सुरू झाल्यास त्याचा सरकारला मोठा फायदा होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
महाराष्ट्र राज्यात लाडकी लेक योजना सुरू आहे. मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेली लाडली बहना योजनामुळं प्रत्येक निराधार, गरजू महिलेला 1 हजार 250 मानधन मिळतंय. त्यामुळंच आता शिंदे सरकार या योजनेचा प्राधान्यानं विचार करत असून लवकरच अशी योजना जाहीर करण्याची तयारी सुरू आहे - वैजनाथ वाघमारे, प्रवक्ते शिंदे गट
महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची :मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या विजयासाठी लाडली बहना योजना गेम चेंजर असल्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशात लाडली बहना योजना सुरू केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, तसंच त्यांना बालसंगोपनात सक्षम करण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपये दिले जात होते. मात्र, त्यात बदल करून 1 हजार 250 रुपये प्रति महिना करण्यात आला. त्यामुळं महिलांना दरवर्षी 15 हजार रुपये मिळत आहेत. या योजनेचा 1 कोटी 31 लाखांहून अधिक महिलांना फायदा झाला आहे.