मुंबई :कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका करण्यात आली. आज लॉकडाऊन नसताना आताच्या मुख्यमंत्र्यांवर फेसबुक लाईव्ह करण्याची वेळ ( CM Eknath Shinde Facebook Live ) आली आहे. असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला लगावला ( Kishori Pednekar criticize Eknath Shinde ) आहे.
संताजी धनाजी प्रमाणे उद्धव ठाकरे दिसतात :काल मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे महाराष्ट्रातील नागरिकांशी संवाद साधला यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. कोरोना काळात ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांनाच आज फेसबुक लाईव्ह करावे लागले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे असे पेडणेकर म्हणाल्या. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, तसेच जे शिवसेना सोडून गेले आहेत त्यांच्यामधील काही आमदार नाराज आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे हे आमदार परत जातील अशी भीती फुटीर आणि भाजपाला आहे. यामुळे त्यांना संताजी धनाजी प्रमाणे उद्धव ठाकरे दिसत आहेत असे पेडणेकर म्हणाल्या. राज्यात ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय. उद्धव ठाकरे बांधावर गेले होते. शेतकऱ्यांसाठी जे करायला हवे ते नेते करत आहेत. आमचे दौरे घड्याळाच्या काट्यावर मोजत आहात मात्र आमचे दौरे घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर असे नाहीत असा टोला पेडणेकर यांनी लगावला.