मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. शनिवारी, १ ऑगस्टपासून २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील, याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल. सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही. जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदवणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये, याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खासगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.
प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खासगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे
अमरावती – ९० संस्था, १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता