मुंबई- पावसाळ्यात अनेकवेळा मुंबईची तुंबई होते. रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त होतात. अशावेळी मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापलिकेकडून पूर आपत्ती व्यवस्थापन उभारले आहे. यावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगने ताशेरे ओढले आहेत. यामुळे पालिकेच्या कामाची पोलखोल झाल्याने त्याची चौकशी करून पालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. भाजप सरकारने हा शिवसेनेवर ठपका ठेवला असल्याचेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
जागतिक दर्जाच्या मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत बोलताना गेले तीन दिवस पाऊस जास्त पडला हे मान्य आहे. पण, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही याला पर्जन्य जलवाहिन्या विभाग दोषी आहे. मुंबईकरांना दिलासा देण्यात महापालिका अपयशी ठरली, असा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजप सरकारने शिवसेनेवर ठपका ठेवल्याने पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी झोपेतून जागे होऊन, मुंबईकरांना त्याचे उत्तर देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यानी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पिकनिक स्पॉट झाला आहे. त्यात योग्य प्रकारे काम होत नाही, अशी टिका करत मुंबईत पाणी तुंबले तरी पाणी तुंबले नसल्याचे खोटे ट्विट केले जात असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.