मुंबई : महाराष्ट्राची कायम एक राजकीय संस्कृती राहिलेली आहे. राजकीय विरोधक म्हणून एकमेकांवर कायम चिखलफेक होत असते. अनेकवेळा आपले मत, आपली बाजू खरी आहे हे दर्शवण्यासाठी आरोपांची पातळी वैयक्तिक स्तरावर येते. मात्र, काही नेत्यांमध्ये बोलणेच बंद व्हावे असे घडत नाही. परंतु, अशी परिस्थिती निर्माण झाली की काय अशी शंका यावी असे देवेंद्र फडणवीस यांच्या काही वक्तव्यांवरून जाणवते. एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझे आणि उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक वैर नाही. मी आजही त्यांच्यासोबत चहा घेऊ शकतो. मात्र, पाच वर्ष सोबत राहूनही त्यांनी माझे फोन उचलले नाहीत. तसेच, मातोश्रीचे दरवाजेही त्यांनी माझ्यासाठी बंद केले अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यावरून या दोन नेत्यांमध्ये वैयक्तिक कटुता आली आहे असे दिसते.
मी रश्मी वहिनींशीही बोललो : माझे कोणाशी वैर नाही. मी कोणाशीच राजकीय वैर धरत नाही. आजही त्यांच्याशी वैर नाही. राजकीय दृष्ट्या निश्चितपणे मी त्यांचा विरोधक आहे. अतिशय ताकदीने मी त्यांचा विरोध करेन, पण वैयक्तिक आजही माझे त्यांच्यासोबत वैर नाही. त्याचवेळी, परवा एका कार्यक्रमात मला रश्मी ठाकरे वहिनी मला भेटल्या. त्यावेळी मी वहिनींशीही बोललो. त्यावेळी त्यांना ही सांगितले की, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा असही फडणवसी यावेळी म्हणाले आहेत.
फोन घेणे बंद केले : महाराष्ट्राची संस्कृती कटुता बाळगण्याची नाही. त्यामुळे मी रश्मी वहिनींशी मी बोललो आणि उद्धजींना नमस्कार सांगा असे म्हणालो. कारण ही संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीच्या पलिकडे मी कधीच जाणार नाही. परंतु, पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करत आहोत. सरकार चालवले, त्यांनी नंतर फोन घेणे बंद केले. बऱ्याचदा त्यांना फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. तसेच, मातोश्रीचे दरवाजे देखील माझ्यासाठी बंद केले, अशी खंत व्यक्त केली. हे त्यांनी केले की इतर कोणी केले माहीत नाही, पण त्या गोष्टीचे मला दु:ख आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.
हे दोन नेते आता वैयक्तिक कटुता बाळगून वागतात का ? : काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत असाच एक खुलासा केला होता. होय मी बदला घेतला असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामागे आपण असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आम्हाला उद्धव ठाकरे यांनी धोका दिला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेले. त्याचाच हा आम्ही बदला घेतला असा जाहीर खुलासा फडणवीस यांनी यावेळी केला होता. त्यामुळे फडणवीस यांनी जाहीरपणे केलेल्या या वक्तव्यांवरून लक्षात येते की राजकीय विरोधक आहेत. मात्र, हे दोन नेते आता वैयक्तिक कटुता बाळगून वागत आहेत का? अशी शंका कायम येईल अशी परिस्थिती आहे.
हेही वाचा: र्जिकल स्ट्राईकबाबत दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी सहमत नाही: राहुल गांधी