मुंबई - मी बाबू-कारकुंडा नाही, तर संघ स्वयंसेवक आहे, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत ठासून सांगितले. अभिमन्यू पवार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी स्वीय सहायक आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांचा स्वाभिमान अचानक जागृत झाल्याचे विधानसभेत दिसून आले.
ते म्हणाले, मी भाजपचा कार्यकर्ता , संघाचा स्वयंसेवक आहे. कुठला बाबू कारकुंडा नाही. पुरवणी मागण्यांवर ग्रामविकास,सहकार आणि पणन विभागावर बोलताना आमदार पवार यांनी सामान्य कार्यकर्त्यांचे नेतृत्वाचे गुण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतुन पुढे येतात, असा उल्लेखही केला.
हेही वाचा -विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात
यावर राष्ट्रवादीचे आमदार जेष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी पवार यांना टोला लगावला. ते म्हणाले, केवळ जिल्हा परिषदच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही नेतृत्व पुढे येते. सोळंके असे म्हणाल्यावर, सभागृहात एकाच हशा पिकला. यानंतर पवार यांनी चर्चा मध्येच थांबवून मी लिखापडी करणारा बाबू-कारकुंडा नाही. तर मी भाजपचा कार्यकर्ता आणि संघाचा स्वयंसेवक असल्याचे सभागृहाला सांगितले. आपल्या या कार्याची दखल घेऊनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा मतदार संघातून तिकीट दिले आणि 30 हजारच्या मताधिक्याने मी निवडून आलो.
दरम्यान, पवार आणि सोळंके यांच्या या शाब्दिक जुगलबंदी नंतर सभागृहात पवार यांच्या स्वाभिमानाची एकाच चर्चा विधान भवन परिसरात होती.