मुंबई : मुंबईमधील गरीब आणि गरजू रुग्णांना मुंबई महापालिकेच्या महापौर निधीमधून ( Mumbai Municipal Fund ) आर्थिक मदत केली जाते. मार्चमध्ये कार्यकाळ संपल्याने महापालिका बरखास्त ( Dissolution of Municipal Corporation ) करण्यात आली आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांच्या २०० हुन अधिक नातेवाईकांनी मदतीसाठी अर्ज करून सुद्धा त्यांना या निधीमधून आर्थिक मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे पालिकेकडे यासाठी निधी आहे, मात्र पालिकेच्या निवडणुका ( Municipal elections ) झाल्या नसल्याने महापौर पदावर कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. यामुळे पालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन गरीब गरजू नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
महापौर निधी मधून रुग्णांना मदत :रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यावर खर्च आवाक्याबाहेर गेल्यावर इतर ठिकाणाहून आर्थिक मदत मिळवण्यासाठी नातेवाईक प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध संस्था, ट्रस्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच मुंबई महापालिकेच्या महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात. महापौर निधीमधून २०११ पासून रुग्णांना प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जात होती. महापौर निधीमधून देण्यात आलेले ५ हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे २०१९ मध्ये विश्वनाथ महाडेश्वर महापौर असताना त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ हजार रुपयांच्या मदतीत वाढ करून १५ हजार रुपये रुग्णांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्दय शस्त्रक्रिया तसेच किडणी रोपण या आजारांच्या रुग्णांना प्रत्येकी २५ हजार तर डायलेसीसच्या रुग्णांकरिता १५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या महापौर निधीला दानशूर व्यक्तींकडून मदत दिली जाते त्याच्या व्याजामधून रुग्णांना ही आर्थिक मदत केली जाते अशी माहिती पालिकेची चिटणीस विभागाकडून देण्यात आली आहे.
महापौर निधी वाढवण्यासाठी प्रयत्न :महापौर निधीच्या रकमेत वाढ करावी यासाठी मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवकांनी आपल्या एक महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी द्यावे असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले होते. असेच आवाहन त्यानंतरच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपले दरमहा मिळणारे २५ हजार मानधन या निधीला दिले होते. सध्या महापौर निधीमध्ये २ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये जमा आहेत. त्यावर दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख रुपये व्याज मिळते. आतापर्यंत १३ लाख १० हजार २३० रुपये इतके व्याज जमा आहे. महापौर निधीमध्ये जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजामधून गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. यंदा पालिका अस्तित्वात नसल्याने हा निधी पडून आहे मात्र त्यामधून कोणालाही मदत करण्यात आलेली नाही.