मुंबई -एनआयच्या विशेष न्यायालयाने काल (रविवारी) सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर आज (सोमवारी) त्यांचे निलंबन करण्यात आले.
वाझेंची तब्येत बिघडली -
दरम्यान, आज सचिन वाझेंची तब्येत बिघडली. यानंतर त्यांना तपासणीसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिकडे चौकशीसाठी ठाण्यात मनसुख हिरेन यांचे भाऊ विनोद हिरेन आणि मुलगा मीत हिरे या दोघांना चौकशीसाठी ठाण्यातील एटीएस कार्यालयात आणण्यात आले.
एनआयएच्या हाती सीसीटीव्ही फुटेज -
दुपारी अँटिलिया प्रकरणी आणखी एक बातमी समोर आली. एनआयएच्या हाती काही सीसीटीव्ही फूटेज लागले आहेत. कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे. यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती. त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यासह संपूर्ण CIU युनिट अडचणीत आले आहे.
हेही वाचा -Live Updates : वाझे-मनसुख प्रकरण: वाझेंना अटक बेकायदेशीर; मुंबई न्यायालयात याचिका दाखल
एनआयएचा संशय -
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की दुसरं कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे तिथं उपस्थित होते का?, याचा तपास करण्यास एनआयएने कडून केला जात आहे. त्यामुळं सचिन वाझे यांना पीपीई किट घालून एनआयए चालायला लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली. या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे.
वाझे कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका -
एनआयएने सचिन वाझेंना केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात हेबियास कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुरावे नसतानाही सचिन वाझेंना अँटिलिया प्रकरणात गोवले, असा उल्लेख सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म वाझे यांनी याआधीच संपुर्ण प्रकरणात अनिश्चितता असल्याचे बोलून दाखवले होते. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतरही त्यांनी या संपुर्ण प्रकरणात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसारच आज सोमवारी सचिन वाझे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा -वाझे प्रकरणात शिवसेना युवानेत्याचे नाव; कोण आहेत वरूण सरदेसाई?