मुंबई- गावात भीषण दुष्काळ असल्यामुळे शेतीमध्ये पीक होत नाही. त्यामुळे बेकारी आली आहे. पदवीचे शिक्षण घेतल्याने हाताला काहीतरी काम मिळेल या उद्देशाने मुंबईत आलो. मात्र, याठिकाणी मिळेल ते काम करण्याची वेळ आली. त्यामुळे आज गटारात उतरून गटार स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुणी मुलगीही द्यायला तयार नाही. ही करुण कहाणी आहे बेकारीमुळे गटारकाम करणारा पवन खडसेची...
पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊनही करतोय गटार साफ, बेकारीमुळे ओढावली परिस्थिती
बेकारीमुळे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणावर गटारे साफ करण्याची वेळ आलेली आहे. त्याला त्याची परिस्थिती सांगताना अश्रू अनावर होत होते.
पवन शंकर खडसे हा मुळचा वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे २००१ साली पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. मैदानी गुण कमी मिळाल्याने पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
पोलीस भरतीला आलेली त्यांच्यासोबतची मुले भरती झाली. मी प्रयत्न करायचो पण बेकारी असल्याने घरची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे काम करावे लागत असे. मी आज मुंबईत गटारातील घाण, गाळ काढतो. त्यामुळे आज मला कोणीही मित्र बोलत नाहीत. लग्न करावे यासाठी पाहुणे मुलगा काय करतो? हे विचारतात. गटार सफाईचे काम करतो, असे माहिती झाल्यास पाहुण घरीच येत नाही. अशी वेळ कोणत्याही तरुणावर येऊ नये, असे म्हणत पवन खडसेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.