महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रस्सीखेच'ची घोडदौड आंतरराष्ट्रीय पातळीवर, भारतात मात्र प्रशासनासह सरकारचे दुर्लक्ष

रस्सीखेच इतर खेळाप्रमाणे महत्त्वाचा मानला जात नाही. तरीसुद्धा मुंबईतील काही मुले मात्र हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेण्यासाठी धडपडत आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून ही मुले परदेशात जाऊन हा खेळ खेळत आहेत आणि विजेतेपदावर आपले नाव कोरत आहेत.

By

Published : Jun 10, 2019, 11:54 AM IST

Updated : Jun 10, 2019, 1:14 PM IST

'रस्सीखेच'ची घोडदौड आंतरराष्ट्रीय पातळीवर

मुंबई - पूर्वी मैदानी खेळांची खूपच चलती होती. घरातील एकतरी व्यक्ती एखाद्या खेळात पारंगत असायचा. त्यामुळे शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त असायचे. मात्र, काळ जसा बदलत गेला तसे खेळाचे प्रकार बदलत गेले. वेगवेगळ्या आधुनिक खेळाने आपले वर्चस्व वाढवले व मातीतले खेळ लोप पावत गेले. तसाच एक भारतीय लोकप्रिय खेळ म्हणजे रस्सीखेच. हा खेळ सध्या लोप पावला आहे. परंतु, काही खेळाडू हा खेळ खेळून विदेशपातळीवर देशाचे नाव लौकिक करत आहेत. जाणून घेऊया, याबद्धल.

रस्सीखेच'ची घोडदौड आंतरराष्ट्रीय पातळीवर

रस्सीखेच इतर खेळाप्रमाणे महत्त्वाचा मानला जात नाही. तरीसुद्धा मुंबईतील काही मुले मात्र हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेण्यासाठी धडपडत आहेत. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून ही मुले परदेशात जाऊन हा खेळ खेळत आहेत आणि विजेतेपदावर आपले नाव कोरत आहेत. त्याचबरोबर दादर शिवाजी पार्क मैदानात हा खेळ कशाप्रकारे उत्तम आहे याचे प्रात्यक्षिक करूनही दाखवत आहेत. मात्र, सरकारच्या लक्षात अद्याप ही गोष्ट आलेली नाही. नुकत्याच झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेमध्ये या मुलांनी विजेतेपदसुद्धा जिंकला आहे. पण तरीसुद्धा प्रशासनाचा आणि या खेळाचा काहीही देणे-घेणे नसल्यासारखाच एक अविर्भाव सध्या दिसत आहे.

या खेळाची क्रेझ कमी होण्याची कारण म्हणजे हा खेळ कमी वेळेत पूर्ण होणार असल्यामुळे या खेळासाठी कुणी मदत करत नाही. त्यामुळे हा खेळ कमी प्रमाणात खेळत असल्यामुळे सरकारही योगदान देत नाही. तसेच या खेळाला सध्या शासनाकडून मान्यता देखील नाही. आता हा खेळ खेळणारे खेळाडू आपल्या पैशातून स्पर्धा खेळत आहेत आणि आंतराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकून देशाचे नाव उंचावत आहे.

सध्या भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. आयपीएलपासून वर्ल्डकपपर्यंत सगळेच क्रिकेटच्या या आनंदात बुडालेले आहेत. भारतात फक्त क्रिकेट हा एक खेळ उत्तम प्रकारे खेळला जातो. त्यामुळे त्याला प्राधान्य दिले जाते. सर्व आधुनिक खेळात जिंकण्यासाठी पुढे पुढे जावे लागते. मात्र, रस्सीखेच हा असा गेम आहे ज्यामध्ये पुढे न होता मागे पळून स्पर्धा जिंकली जाते. हा खेळ शक्तीने खेळला जातो, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण ही समज चुकीची आहे. कारण हा खेळ शक्तीने नाही तर युक्तीने हा खेळला जातो, असे ही रस्सीखेच खेळणारी मुले सांगतात.

ही रस्सीखेच खेळणारी मुले शालेय जीवनापासून ते आत्तापर्यंत हा खेळ खेळत आहेत. ते या खेळात पारंगतदेखील झाले आहेत. इतर खेळांप्रमाणे या मुलांनासुद्धा बाहेर खेळण्यासाठी अनुदान मिळावे, १९२० पर्यंत ऑलिम्पिकमध्ये असणारा हा खेळ आता पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, यासाठी या मुलांची धडपड सुरू झालेली आहे. त्यात त्यांचे प्रशिक्षक व रस्सीखेच असोसिएशन त्यांना मोठा पाठींबा देत आहेत. त्यामुळे प्रशासन या मुलांचा व खेळाचा विचार करणार का ? आणि ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेबरोबरच रस्सीखेच हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचून पुन्हा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी प्रयत्न करणार का हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Jun 10, 2019, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details