मुंबई - राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व त्यासोबत अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सरकारने आज (शुक्रवार) सातवा वेतन आयोग लागू करण्याचा जीआर काढला आहे. यामुळे राज्यातील तब्बल 5 लाख 50 हजाराहून अधिक शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांच्या वेतनात 10 हजार आणि त्याहून अधिकची भर पडणार आहे.
शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू; साडेपाच लाखाहून जास्त शिक्षकांना होणार फायदा
राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व त्यासोबत अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सरकारने आज (शुक्रवार) सातवा वेतन आयोग लागू करण्याचा जीआर काढला आहे.
सरकारने आज काढलेल्या या शासन निर्णयानंतर राज्यातील शिक्षकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही सातव्या वेतन आयोगाचा जीआर काढला जावा, यासाठी शिक्षक आमदार नागो गाणार व शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे आदींनी शिक्षण मंत्री व वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यासोबत इतर काही शिक्षण उत्कर्ष मंचचे प्रमुख सुधीर घागस यांच्यासह इतर शिक्षक संघटनाही जीआर लवकर काढण्याची मागणी लावून धरली होती. त्यापार्शवभूमीवर सरकारने आज जीआर काढला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
सरकारने काढलेल्या शिक्षकांच्या या जीआरची अंमलबजावणी तातडीने होणार असल्याने शिक्षकांना याचा मोठा दिलासा मिळेल, असे आमदार गाणार यांनी सांगितले. राज्यात साधारणपणे 5 लाख 50 हजाराहून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांना या वेतनाचा लाभ होणार आहे. त्यांच्या वेतनात इतर भत्ते आणि थेट 10 हजार आणि त्याहून अधिकची भर पडणार आहे.