महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हरलेल्या पैलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच 'तो' सोहळा ठरेल, शिवसेनेची नितीश कुमार यांच्यावर टीका

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा गाठला. यात नितीशकुमार व त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. तरी देखील नितीशकुमार मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपने जाहीर केले. या विषयावरुन शिवसेनेने नितीशकुमार यांना लक्ष्य केले आहे.

Gold medal for wrestler who lost the about : Shiv Sena slams Nitish Kumar
हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच 'तो' सोहळा ठरेल, शिवसेनेने नितीशकुमारांना फटकारलं

By

Published : Nov 12, 2020, 12:27 PM IST

मुंबई - बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? स्पष्ट सांगायचे तर बिहारमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पैलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल, अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नितीश कुमारांना फटकारले आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात...

तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे.

खरा विजेता तेजस्वीच...

बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकड्यांच्या खेळात 'एनडीए'ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपास लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे.

मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गोंधळ घालून 'जागा' लाटल्या...

अटीतटीच्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीस 125 जागा मिळाल्या. विधानसभा 243 आमदारांची आहे. त्यामुळे बहुमत 122 चे आहे. पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांचा विजय किती निसरडा आहे ते समजून घ्या. तेजस्वी यादव यांच्या आघाडीस 110 जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा 100 ते 300 च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघांत मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळ घालून 'जागा' लाटल्या, असा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला. 'राजद'ने 119 विजयी उमेदवारांची यादीच घोषित केली. पण निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. त्यातले

ओवेसीमुळे तेजस्वी यांची घोडदौड थांबली...

भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात 'ओवेसी' यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी पिंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली. चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले.

नितीशकुमार यांची वरात काढून त्यात 'घोडे' नाचवले जातील पण....

चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते. इतके असूनही पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा 'खेळ' यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली. आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात 'घोडे' नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही.

नितीशकुमारांना बसवून 'बादशाही'ची सूत्रं भाजपच्याच हाती राहील...

खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून 'बादशाही'ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील. पण त्या बादशाहीवर '110' आकडा असलेल्या भक्कम विरोधी पक्षाचा अंकुश राहील. तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details