मुंबई- मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात असतानाच पालिका रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या युरिन बॅगमध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. ज्या प्रमाणात या युरिन बॅग असायला हव्यात त्यापेक्षा छोट्या असल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे.
महापालिका रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याने येथे लाखो रुग्ण येतात. या रुग्णांवर ओपीडी तसेच भरती करून उपचार केले जाते. रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण गंभीर असल्यास त्यांना लघवी करण्यासाठी शौचालयात जाणे शक्य नसल्याने युरिन बॅग वापरल्या जातात. या बॅगमध्ये दोन लिटर लघवी साठवता येते. तसेच त्याचा पाईप एक मिटरहून लांब असतो. ज्यामुळे लघवीची पिशवी रुग्णाच्या बेडखाली दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवता येते.
मात्र, महापालिका रुग्णालयात पुरवठा करणाऱ्या युरिन बॅगमध्ये दोन लिटर ऐवजी दिड लिटर युरिन साठवता येते. या बॅगचा पाईपही 60 ते 65 सेंटीमीटरचा असल्याने बॅग रुग्णाच्या बाजूला बेडला अडकवली जाते. यामुळे रुग्णाला संसर्ग होण्याची शक्यता आहे. महापालिका रुग्णालयात ज्या युरिन बॅग वापरायला हव्यात त्यापेक्षा छोट्या बॅग डॉक्टर, अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदाराने पुरवठा केल्या आहेत. यामुळे युरिन बॅगचा घोटाळा उघडकीस आला आहे.