मुंबई- एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुंबादेवी मतदार संघामधून काँग्रेसचे अमीन पटेल दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अमीन पटेल यांना तिसऱ्यांदा काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे. मात्र, यावेळी अमीन पटेल यांना ही निवडणूक सोपी नसणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण हे निवडणूक लढवत आहेत.
अमीन पटेल यांना वंचित बहुजन आघाडीच्या या तगड्या उमेदवाराला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे या मतदार संघात अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील बेकायदेशीर बांधकामे, स्वच्छ पाणी, ट्रॅफिक, ड्रग माफिया आदी प्रश्नावर आपण निवडणूक लढवणार असल्याचे पठाण यांनी संगितले.
हेही वाचा - मागाठाणेतील शिवसेना भाजपचे अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
मुंबादेवी मतदार संघातून १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे राज पुरोहित हे अमराठी मतांच्या पाठिंब्यावर आमदार म्हणून निवडून आले होते. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती. त्यात मुंबादेवी मतदार संघाचा विस्तार होऊन डोंगरी, सॅण्डहर्स्ट रोड आदी मुस्लीमबहुल भाग या मतदारसंघांत समाविष्ट झाला आणि या मतदारसंघातील समीकरणे बदलली. त्यामुळे २००९ मध्ये हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला दिला. शिवसेनेने माजी आमदार चंद्रकांत पडवळ यांचे पुत्र अनिल पडवळ यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरविले. मुस्लीम मतांच्या जोरावर काँग्रेसचे अमिन पटेल विजयी झाले. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षात मतांच्या झालेल्या विभाजनामुळे भाजपच्या अतुल शाह यांचा पराभव करत पुन्हा अमिन पटेल विजयी झाले. एकेकाळी भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या अतुल शाह यांना पराभव पत्करावा लागला होता.