महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 3, 2023, 10:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 11:06 PM IST

ETV Bharat / state

Pune ByPoll : कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत शनिवारी अंतिम निर्णय जाहीर करू; मविआची घोषणा

पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील आणि कसबा या ठिकाणच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अद्यापही उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज (शुक्रवारी) संयुक्त बैठक झाली. त्यांनी यासंदर्भात अंतिम निर्णय उद्या (शनिवारी) जाहीर करू, असे माध्यमांसमोर सांगितले.

Mahavikas Aghadi On By Election
मविआची बैठक

पोटनिवडणुकीविषयी बोलताना मविआचे नेते

मुंबई :पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी अकाली निधन पावलेल्या आमदार मुक्ता टिळक यांच्या जाण्यामुळे तेथील पोटनिवडणूक लागली. पुणे जिल्ह्यातीलच चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्याही अकाली जाण्यामुळे त्या ठिकाणची पोटनिवडणूक लागलेली आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी यांच्या वतीने कोणता उमेदवार असेल याबाबतची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. आजही त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही .मात्र या निवडणुकीमध्ये जय्यत तयारीने उतरण्याचे संकेत महाविकास आघाडीने दिले.

महाविकास आघाडीच्या बाजूने कौल :शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी यांच्या बाजूने तीन तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्या बाजूने एक उमेदवार निवडून आला. त्यामुळे महाविकास आघाडी शासनाचा उत्साह आणि हिम्मत वाढल्याचे आज स्पष्टपणे जाणवले. त्या संदर्भातली बाब काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानातून जाणवली. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले यांनी सांगितले की, खोके सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांनी अनेक प्रयत्न करून देखील महाराष्ट्रात सुशिक्षित जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. म्हणजेच राज्यातील जनतेने शिंदे फडणवीस शासनाला ओळखले आहे. हे त्याचे लक्षण आहे.


जनतेने भाजप आणि शिंदे सरकारला नाकारले :या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, एकूणच कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीसाठी आमच्या घटक पक्षांसोबत आम्ही चर्चा करत आहोत. त्यांच्यासोबत आमचा विचार विनिमय होईल. त्याच बरोबर आमच्या प्रत्येक पक्षाकडून त्यांच्या पक्षप्रमुखांसोबत देखील यासंदर्भात सल्ला मसलत होईल आणि एकत्रित उद्या आम्ही या दोन्ही पोटनिवडणुकी संदर्भातला अंतिम निर्णय जाहीर करू. मात्र नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात त्यांनी विधान करताना अधोरेखित केले की, राज्यातील सुशिक्षित जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकार यांच्या उमेदवाराला नाकारलेला आहे. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला आणि कोकणामध्ये आमच्या उमेदवाराने चांगली लढत दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला. राज्यात इतरत्र तीन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे येत्या काळात राज्यातील सुज्ञ जनता यांना बरोबर घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही.


शनिवारी याबाबतचा अंतिम निर्णय :शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले की, शिवसेनेची इच्छा असली आणि तयारी असली की कसबा पोटनिवडणुकीसाठी आमचा उमेदवार असावा. मात्र, यापेक्षा महाविकास आघाडीला काय वाटते. एकूण सर्व पक्ष म्हणून नेमके महत्त्वाचे काय याच्यावर आम्ही भर देत आहोत. त्यामुळेच आमच्या पक्षप्रमुखांना आणि इतर घटक पक्षांना विचारून उद्या (शनिवारी) याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करू. शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या विधानातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेची कसबा या पोटनिवडणुकीसाठी इच्छा असल्याची बाब लपून राहिली नाही. परंतु महाविकास आघाडीला काय वाटते याला अग्रक्रम देत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा :BRS Entry In Maharashtra : अबकी बार किसान सरकार म्हणत बीआरएस करणार महाराष्ट्रात प्रवेश

Last Updated : Feb 3, 2023, 11:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details