महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र, तर मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवा असा पटोलेंचा पलटवार

कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खासदार राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वीच कोरोनाच्या त्सुनामी संकटाचा इशारा दिला होता. मात्र, मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. परिणामी देशात मृतांची सख्या लाखांच्या घरात आहे.

nana patole courage
नाना पटोलेंचा पलटवार

By

Published : May 15, 2021, 6:39 PM IST

Updated : May 15, 2021, 6:56 PM IST

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता पत्र लिहिले आहे. यानंतर आता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिण्याचे धाडस करावे, या शब्दातकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा नाना पटोलेंनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीसाचे सोनिया गाधींना पत्र -

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रे आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यांपुढे ठेवत विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम, याबाबत लिहिले आहे.

हेही वाचा -'मुख्यमंत्र्यांच्या प्रभावामुळेच मराठा आरक्षणावर केंद्राची फेरविचार याचिका'

नाना पटोलेंचा पलटवार?

कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खासदार राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वीच कोरोनाच्या त्सुनामी संकटाचा इशारा दिला होता. मात्र, मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. परिणामी देशात मृतांची सख्या लाखांच्या घरात आहे. केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा याला सर्वस्वी जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्रव्यवहार करण्यापेक्षा देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे खडे बोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावले. तसेच मोदींच्या पापावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस पत्रात काय म्हणाले?
'अगदी 13 मेच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण हे 22 टक्के आहे. जे प्रमाण सातत्याने 30 टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 31 टक्के, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाणही14 टक्के आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल, याच्याशी आपण सहमत असालच. आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे. यात 1.80 कोटी कोरोना लसी, 8 लाखांहून अधिक रेमडेसिवीर, 1750 मेट्रीक टन ऑक्सिजन, कितीतरी वेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर्सचा समावेश आहे. असे असले तरी काही लोकांना मोदींवर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य असल्याचे वाटते'.

हेही वाचा -चक्रीवादळापेक्षाही कोरोनावादळाला थांबवणे गरजेचे - संजय राऊत

पुढे फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे की, 'राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असे वाटते. आता समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटीजेनचे प्रमाण अधिक ठेऊन एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले. कोरोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेत. अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण 0.8 टक्के असताना एकट्या मुंबईत ते 40 टक्के आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होतात. मात्र, 2020 या वर्षांत यात 20,719 मृत्यू वाढले. यातील 11,116 मृत्यू केवळ कोरोनाने झाल्याचे दाखविले. म्हणजे प्रत्यक्षात 9,603 कोरोना मृत्यू दडविले. गेल्या वर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? आजही अंत्यसंस्कारांसाठी थांबावे लागत आहे. देशात दररोज 4000 मृत्यू कोरोनामुळे नोंदले जात असताना त्यातील 850 हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतुक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहे. ग्रामीण भागात बेड्स नाही, उपचार नाही, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे. शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जातात तर त्यांचा पीसीआर सुद्धा मागितला जात नाही, अशी स्थिती आहे, असे सांगताना अमरावतीतील प्रकार देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिला आहे.

Last Updated : May 15, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details