मुंबई- राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षण मंडळासह इतर मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यासाठी सरकारने शासनस्तरावर तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा आज निर्णय जाहीर केला. मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची ही समिती असून त्यात शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार उपाध्यक्ष आणि इतर सदस्य आहेत.
राज्यातील इतर मंडळाच्या शाळांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यासाठी अभ्यास करून ही समिती त्यासाठीचा अहवाल सादर करणार आहे. मात्र, हा अहवाल नेमका किती दिवसांत आणि महिन्यात सादर केला जाईल, याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. मात्र, या समितीत असलेल्या सदस्यांना प्रवास भत्ता, आदी भत्ते देण्याविषयीचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे.
ही समिती शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठी भाषा हा विषय अनिवार्य करण्यासाठी राज्यात असलेल्या इतर मंडळांच्या शाळांचा भाषाविषयक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून आपला अहवाल आणि शिफारशी सादर करणार आहे. सरकारने स्थापन केलेल्या या समितीत सदस्य म्हणून साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, प्रा. कौतिकराव ढाले पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोतापल्ले, रंगनाथ पाठारे, डॉ. रेणू दांडेकर, डॉ. रमेश पानसे, डॉ. दादा गोरे, रमेश कीर, विभावरी दामले, सुधीर देसाई आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांचा समावेश आहे.