महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापौरांकडून अभियंत्याला शिवीगाळ, तर शिवसैनिकांकडून मारहाण? अभियंता आणि महापौरांची मात्र चुप्पी

नाला बंदिस्त करण्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने मातोश्रीजवळील सिग्नल परिसरात नुकत्याच झालेल्या पावसात पाणी साचले होते. त्यामुळे या ठिकाणी महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांसह भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केली असून शिवसैनिकांनी मारहाण केल्याचे समजते.

महापौरांकडून अभियंत्यांला शिवीगाळ

By

Published : Jun 25, 2019, 9:20 PM IST

Updated : Jun 25, 2019, 10:26 PM IST

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख राहत असलेल्या मातोश्रीबाहेरील नाला बंदिस्त करण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. यामुळे या ठिकाणी पाणी साचत असल्याने महापौरांनी मंगळवारी सकाळी पालिका अधिकाऱ्यांसह भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केली असून शिवसैनिकांनी मारहाण केल्याचे समजते. याबाबत अभियंत्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली आहे. मात्र असे काही झालेच नाही, असे महापौरांकडून सांगण्यात आले आहे.

झालेल्या प्रकरणाबाबत बोलताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर


वांद्रे पूर्व कलानगर येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्द्वव ठाकरे राहत असलेले मातोश्री निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाजूलाच खेरवाडी नाला आहे. हा नाला बंदिस्त करण्याचे काम सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने मातोश्रीजवळील सिग्नल परिसरात नुकत्याच झालेल्या पावसात पाणी साचले होते. पावसाचे पाणी साचल्याने याचा त्रास मातोश्रीसह तेथील नागरिकांना होत आहे. याबाबत महापौरांनी आज सकाळी नाल्याला भेट दिली. या भेटीदरम्यान पालिकेचे अभियांत्रिकी सेवेचे संचालक विनोद चिठोरे, पर्जन्य जल विभागाचे उपमुख्य अभियंता विद्याधर खणकर उपस्थित होते.


नाल्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने विभागात पाणी साचत आहे. मातोश्रीला याचा त्रास होत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी अभियंत्यांना महापौरांच्या समोर जाब विचारला. यावेळी शिवसैनिक, महापौर व अभियंत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. महापौरांनीही विद्याधर खणकर या अभियंत्याला शिवीगाळ केली. त्यानंतर शिवसैनिकांकडून खणखर यांना मारहाण करण्यात आल्याचे समजते. यानंतर उप मुख्य अभियंत्यांना मारहाण झाल्याने इतर अभियंत्यांनी अभियांत्रिकी सेवेचे संचालक विनोद चिठोरे व विद्याधर खणकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. याबाबत मारहाण झालेल्या खणखर यांच्याशी संपर्क साधला असता मी माझे म्हणणे पालिका आयुक्तांच्या कानावर घातले आहे. ते काय तो निर्णय घेतील, असे सांगितले आहे.


असे काहीच झाले नाही - महापौर


कला नगर जंक्शन जवळ पाणी साचत असल्याने लोकांच्या तक्रारी आहेत. खेरवाडी नाल्याचे काम संथ गतीने सुरू आहे. ५ मीटरचे काम राहिल्याने पाणी साचत आहे. त्यामुळे मी त्या नाल्याला आज सकाळी भेट दिली. त्या ठिकाणी मातोश्री आहे किंवा मी जातो, पाणी साचण्याचा आम्हाला त्रास होतो म्हणून भेट दिली नाही. अभियंत्यांला मारहाण झाल्याचे मला माहीत नाही. माझ्या पुढ्यात काही झालेले नाही, असा खुलासा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

Last Updated : Jun 25, 2019, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details