मुंबई- महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून टॅब देण्यात आले. मात्र, त्यापैकी बहुतेक टॅब बंद पडले आहेत. ऐन 10 वीची परीक्षा जवळ आली असतानाही टॅबचा उपयोगच होत नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण समितीतून समोर आली. येत्या 9 जानेवारीला होणाऱ्या विशेष सभेत याबाबत माहिती देण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.
टॅब योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून आहे. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून टॅब देण्याची योजना सुरू करण्यात आली. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र, सध्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे. सुमारे 40 हजार टॅब इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र, यातील बहुतांशी टॅब सध्या बंद असल्याने पडून आहेत. काही टॅबमध्ये एसडी कार्ड नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याने हे टॅबही वापराविना आहेत.
इयत्ता 10 वीची परीक्षा जवळ आली असतानाही विद्यार्थ्यांना टॅब नसल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या टॅबच्या दुरुस्तीसाठी नवे कंत्राट दिले जाणार आहे, असे सांगत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडून याबाबतची वस्तूस्थिती समोर आणली.