मुंबई - भाजपा आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 2009 मधील मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक गैरव्यवहारा संबंधात ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात 2014 मध्ये प्रसाद लाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असल्याचे समोर येत आहे.
सेनेच्या मागे ईडी तर भाजपाच्या मागे आर्थिक गुन्हे शाखा -
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे विमल अग्रवाल या व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर या संदर्भात तपास केला गेला. या तपासादरम्यान प्रसाद लाड यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व भाजपामध्ये चाललेल्या राजकारणावरून आता पुन्हा एकदा वेगळी चर्चा पाहायला मिळत आहे. या अगोदर शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना 11 जानेवारी रोजी पुन्हा एकदा ईडी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना 6 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहायचे होते. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे ते हजर राहू शकले नाही. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या वकिलामार्फत ईडीला याबाबत कळवले आहे. आता आर्थिक गुन्हे शाखेकडून बीजेपीच्या प्रसाद लाड यांनासुद्धा चौकशीसाठी नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामुळे सेनेच्या मागे ईडी तर भाजपाच्या मागे आर्थिक गुन्हे शाखा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
यांना मिळाली आहे चौकशी नोटीस -
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यांच्या मुलाच्या कंपनीची झडतीही घेण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडी समन्स बजावले आहे.