मुंबई -कोरोना लस कोणत्याही क्षणी भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सज्ज झाले आहे. तर, ही लसीकरण मोहीम योग्य प्रकारे पार पडावी यासाठी उद्या ड्राय रन घेण्यात येणार आहे. राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रात ड्राय रन पार पडणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -एसईबीसी अंतर्गत राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया- गृहमंत्री
या आधी 4 जिल्ह्यात रंगीत तालीम पार
कोरोना लसीकरणाच्या पूर्व तयारीला राज्यात तीन-चार महिन्यापूर्वीच सुरवात करण्यात आली होती. त्यानुसार लसीची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार करण्यापासून ते डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सगळ्या काही गोष्टी पूर्ण करत राज्य लसीकरणासाठी सज्ज झाले आहे. तर, आपली तयारी योग्य आहे का, याची पडताळणी करण्यासाठी लशीचे ड्राय रन, अर्थात रंगीत तालीम घेतली जात आहे. या मोहिमेनुसार आधी पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूरमध्ये ड्राय रन पार पडली. त्यामुळे, आता उर्वरित जिल्यात उद्या ड्राय रन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
25 जणांना लस
ड्राय रनच्या तयारीला आज सकाळपासून राज्यभरात सुरवात झाली आहे. जिल्ह्यात 3 आरोग्य केंद्रावर, तर महानगरपालिका क्षेत्रात एका आरोग्य केंद्रावर ही ड्राय रन होणार आहे. तर, 25 जणांचे यावेळी लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व लसीकरण केंद्रावर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत ड्राय रन यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -मी 'दुसऱ्यां'सारखा हंगामा करणार नाही, नोटीसशी माझा काहीही संबंध नाही - प्रसाद लाड