मुंबई- शहरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. मात्र, त्याचवेळी धारावी लगतच्या माहीममध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. तेव्हा धारावीतील कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी जो क्लिनिक-स्क्रिनिंग पॅटर्न राबवला गेला तोच पॅटर्न माहीममध्ये राबवण्यात येण्याची शक्यता आहे. धारावी-माहीम मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने यादृष्टीने विचार सुरू केला असून लवकरच हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेसमोर ठेवला जाणार आहे.
धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पालिकेने खासगी डॉक्टरांच्या अर्थात असोसिएशनच्या मदतीने डोअर टू डोअर स्क्रिनिंग मोहीम राबविली. यात 40 हजार धारावीकरांचे स्क्रिनिंग केले. शेकडो संशयित रूग्ण शोधून काढले. हजारोंच्या संख्येने लोकांना क्वारंटाईन केले. मात्र, गल्लीबोळातून पीपीई किट घालून फिरणे डॉक्टरांना अशक्यप्राय होऊ लागले. त्यातच या मोहिमेतील तीन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ही मोहीम तात्काळ बंद करत असोसिएशनने धारावीतील आपले सर्व क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर, पालिकेने डॉक्टर-आरोग्य सेविकांना पीपीई किटसह इतर मदत दिली. त्यानुसार क्लिनिक सुरू करत सर्व रुग्णांना तपासण्यास सुरवात केली.