मुंबई : गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुखांनी काश्मिर फाइल्स चित्रपटावर टीका केली होती. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत प्रतिक्रिया ( Devendra Fadnavis on The Kashmir Files ) व्यक्त केली. ते म्हणाले की, संशोधनानंतरच द काश्मीर फाइल्स ( The Kashmir Files ) या चित्रपटात सत्य दाखवण्यात आले होते. भारताच्या सेन्सॉर बोर्डाने त्याला मान्यता दिली. चित्रपटाबद्दल अशी टीका करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
इफ्फीच्या ज्युरी प्रमुखांनी केली होती टीका -गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सोमवारी (28 नोव्हेंबर) सांगता झाली. या फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी मंचावर बोलताना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर टीका केली होती. या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी द काश्मीर फाइल्सला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असे म्हटले होते. आम्ही सर्वजण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराज आणि आश्चर्यचकीत झालो होतो. हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरे काही वाटले नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे, असे ते फेस्टिवल दरम्यान मंचावर बोलताना म्हणाले होते.