महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट, राज्यातील जनतेला पदवी केली समर्पित

Devendra Fadnavis Honorary doctorate कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी ही पदवी राज्यातील जनतेला समर्पित केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 10:21 PM IST

मुंबईDevendra Fadnavis Honorary doctorate : राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या जहांगीर कावसजी सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अतिशय भावोत्कट मनोगत व्यक्त केले. भारत जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना त्यांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, कोयासन विद्यापीठ हे कू काई यांनी सुरू केले. त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला. जगातील महत्वाचे केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे. मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो. त्यामुळे या क्षणी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

महाराष्ट्र – कोयासन मैत्रीची सुरुवात तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री असताना मी तिथे गेलो. भारतरत्न डॉ .बाबासाहेबांचा पुतळा तेथे आपण बसवला. आताही ही मैत्री निरंतर सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांनी सांगितले. जपानने सातत्याने भारताला आणि महाराष्ट्राला मदत केली. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. त्यामुळेच हा केवळ मैत्रीचा नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारा अध्याय आहे. कोयासन विद्यापीठाने डॉक्टरेट देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टीचा विचार केल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या - इतिहासात प्रथमच देशाबाहेरील मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आहे. जलसुलभता आणि सामाजिक ऐक्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांना देण्यात आली. महाराष्ट्र आणि जपान यांचे नाते दृढ करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे. आपले राज्य परकीय गुंतवणूक करण्यात आघाडीवर त्यात जपानने सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली असल्याचे ते म्हणाले.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा सातत्याने ध्यास घेतलेले उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांचे व्यक्तिमत्व आहे. राज्यात त्यांच्या कार्यकाळात मोठी गुंतवणूक झाली. जपानच्या विद्यापीठाकडून एका उमद्या व्यक्तीमत्वाचा सन्मान झाला आहे.

डॉ. फुकाहोरी यासुकाता म्हणाले की, ही उपस्थिती सर्वांसाठी आनंददायी आहे. कोयासन विद्यापीठ हे ख्यातनाम विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला 1200 वर्षाचा इतिहास आहे. डॉ. फडणवीस यांनी जपानचा दौरा केला. अनेक उद्योजकांना भेटले. त्यानंतर अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एक व्यक्ती म्हणून ते खूप छान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यामाशिता योशियो यांनी यावेळी मानद डॉक्टरेट पदवीच्या मानपत्राचे वाचन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कुलकर्णी यांनी स्वागत केले तर आभार उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांवळे यांनी मानले.

कार्यक्रमास राज्य मंत्रीमंडळातील सदस्य, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नामवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details