मुंबई:महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सहकार्य वाढविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, यासाठी यंत्रणा विकसित करणे, संस्थागत संबंध वाढविणे, क्षमता निर्माणाचे कार्य करणे आणि आर्थिक संबंधांना चालना देणे हे उद्देश या सामंजस्य करारातून साध्य केले जाणार आहेत. मॉरिशसचे अर्थमंत्री डॉ. रेनगॅनाडेन पदयाची, परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, माहिती-तंत्रज्ञान मंत्री दीपक बालगोबिन, भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला तसेच मॉरिशसमधील उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्र-मॉरिशस यांच्या मैत्री संबंधातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.
औद्योगिक उत्पादनात वाटा २० टक्के:महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा २५ टक्के आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी २८ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते तर औद्योगिक उत्पादनात वाटा २० टक्के आहे. कोविड काळाचा अपवाद सोडला तर महाराष्ट्राचा 'सीएजीआर' (कंपाऊंड ॲन्यूअल ग्रोथ रेट) हा सातत्याने १० टक्के आहे. सर्वाधिक विद्यापीठे, वीजनिर्मिती आणि वीजवापर महाराष्ट्रात असून राज्याची डेटा क्षमता ६५ टक्के आहे. महाराष्ट्र ही देशाची 'स्टार्टअप राजधानी' असून ८० हजार पैकी १५ हजार 'स्टार्ट अप' आणि १०० पैकी २५ युनिफॉर्न हे येथेच आहेत. महाराष्ट्र हे देशाची व्याघ्र राजधानीसुद्धा आहे आणि ७०० किमीचा समुद्र किनारा राज्याला लाभला आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.