मुंबई- विसाव्या शतकात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली. मात्र, या ओघात अनेक गोष्टी नामशेष होताना दिसत आहेत. ९० च्या दशकात खेळले जाणारे भवरा, विटी दांडू इतकेच नव्हे तर, पतंगबाजीचा देखील लहान मोठ्यांना विसर पडल्याचे चित्र आहे. मकर संक्रांतीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना पतंग विक्रीच्या दुकाने ओस पडल्याचे दिसून येत आहे.
मकर संक्रातीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. आकाशात उंच उंच पतंग उडविणे हा मुलांचा आवडता खेळ. मात्र, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पतंग आकाशात न उडता दुकानात लटकल्याची दृश्य दिसत आहे. दादर येथील पतंगांच्या दुकानात विविध पतंगी विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, खरेदीसाठी ग्राहकच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मकरसंक्रात आली की लहान मुलांची पतंग विक्रेत्यांच्या दुकानात झुंबड उडायची. दुकानातून पतंग आणि मांजा खरेदी करून पतंग कापण्याची चुरस लागायची. तर, काही ठिकाणी पतंग महोत्सव भरायचे. मात्र, काळानुरूप हळूहळू हे प्रमाण कमी झाले आहे.
आजचे युग हे मोबाईलचे युग आहे. तरी देखील पतंगप्रेमींसाठी वर्षानुवर्षे पतंग विकणाऱ्या दुकानात विविध प्रकारचे विविध आकारातील पतंगी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कागदाच्या त्याचप्रमाणे मेटालिक पेपरमध्ये बनविण्यात आलेल्या पतंगी, कार्टूनचे चित्र असलेल्या पतंगी, सिनेकलाकारांचे फोटो असलेल्या पतंगी देखील उपलब्ध आहेत. मात्र, तरी देखील लोकांनी या पतंगांकडे पाठ फिरवली आहे.