मुंबई: ठाकरे गटात नाराज असलेल्या दिपाली सय्यद गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दिपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही तारीख पे तारीख सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध आहे. तरीही प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंध यामुळे ताणले जातील. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला असल्याचे बोलले जाते.
दीपाली सय्यद यांचा प्रवेश लांबला:बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी दिपाली सय्यद यांनी प्रयत्न केले. प्रयत्न असफल ठरल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी आजवर किमान चार ते पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. बुधवारी ९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना, येत्या शनिवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्षप्रवेश पुढे ढकलत रविवारी १३ नोव्हेंबरला ठेवण्यात आला. सुरुवातीला पक्षप्रवेशाचे ठिकाण वर्षा निवासस्थान ठेवण्यात आले. रात्री ऐनवेळी या ठिकाणात बदल करत ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी प्रवेश करणार असल्याचे दीपाली सय्यद यांच्याकडून सांगण्यात आले. दुपारी एक वाजताची वेळ देण्यात आली. मात्र आजचा प्रवेश ही पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी तारीख आणि वेळ मिळणार असून त्या दिवशी प्रवेश करणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले आहे.