मुंबई : 'आगामी विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील. देवेंद्र फडणवीस यांनी तसा जाहीर उच्चार केला आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात याला महत्त्व नाही', असा टोला शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी लगावला आहे.
'मुख्यमंत्री विश्रांती घेण्यासाठी साताऱ्याला गेले' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत किंवा मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत, अशा पद्धतीच्या चर्चांबद्दल त्यांना विचारले असता दीपक केसरकर म्हणाले की, 'अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाही. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री हे 24 तास काम करतात. त्यामुळे त्यांना प्रकृती स्वास्थ लाभावे आणि विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सक्तीने दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी सातारा येथे नेले आहे. त्यामुळे कुठल्याही अन्य वावड्यांना खतपाणी घालू नये'.
'आगामी निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच' : दीपक केसरकर पुढे म्हणाले की, '2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यासंदर्भात आताच बोलणे योग्य नाही. तो भाजप आणि शिवसेना शिंदे गट मिळून निर्णय घेईल. मात्र सध्या तरी 2024 च्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील हे स्पष्ट आहे. तशा पद्धतीचे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या पक्षासंदर्भात वक्तव्य करू शकतात, मात्र त्यांच्या वक्तव्यापेक्षा फडणवीस यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली होतील', असे ते म्हणाले.