मुंबई Ayodhya Temple News : २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाही होणार आहे. हा संपूर्ण देशातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. या निमित्तानं देशात, राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. म्हणून या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपा नेते मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे याच पद्धतीची मागणी काही दिवसापूर्वी भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.
काय आहे पत्रात : २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचं भव्य उद्घाटन आणि राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. संपूर्ण देशाचे आणि श्रीराम भक्तांचं लक्ष या कार्यक्रमासाठी लागलं आहे. त्याचप्रमाणं प्रभू श्री राम हे संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत. अयोध्येतील मंदिर हे केवळ मंदिर नसून तर ते राष्ट्र मंदिर आहे. यामुळं २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीमध्ये भगवान श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत असताना महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाची आहे. आपण त्यांच्या मागणीनुसार राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. तसंच सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक दीपोत्सवासाठी सुद्धा परवानगी द्यावी, अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केलीय.
अतुल भातखळकर यांचीही मागणी : तीन दिवसांपूर्वी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा अशाच पद्धतीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. २२ जानेवारीला अयोध्यामध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी करा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. घरोघरी दिवे पेटवण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी विनंती केली आहे. राज्यातील अनेक राम भक्त या दिवशी अयोध्येला जाणार आहेत. अनेक ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित राहता यावे यासाठी ही सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. याबाबत खासगी आस्थापनांना सुद्धा आवश्यक ते सर्व निर्देश द्या, असंही आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलंय.
मुख्यमंत्री सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबईसह राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी करावी अशी जनतेला विनंती केली आहे. २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५०० वर्षाचा संघर्ष हा प्रभू राम मंदिर उभारण्यासाठी करण्यात आला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर त्याचबरोबर भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण मुंबईसह राज्यात या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून हा दिवस भारताच्या इतिहासातील महत्वाचा दिवस ठरणार आहे.
हेही वाचा -
- धर्मांतर केल्यानंतर आदिवासी समाजाचा लाभ मिळणार का? मंत्री लोढांची महत्त्वपूर्ण घोषणा
- राम दरबार ते सीता कूप, वाचा अयोध्येतील श्रीराम मंदिराची खास वैशिष्ये
- राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा