मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेकांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्याची लक्षणे त्या व्यक्तीमध्ये दिसत नाहीत. कोरोनाचा विषाणू खोकल्यावर, शिंकल्यावर इतरांच्या शरीरात जाऊ शकतो. त्याचप्रमाणे तो डायलेसिसच्या माध्यमातूनही जाऊ शकतो. यामुळे डायलेसिस करताना सर्व रुग्णांची कोरोनाची तपासणी करण्यात यावी, असे आदेश पालिकेने सर्व डायलेसिस केंद्रांना दिले आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील ५ रुग्णालयांमध्ये डायलेसीसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
डायलेसिस करताना कोरोनाची तपासणी बंधनकारक; मुंबई पालिकेचा आदेश
कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व डायलेसिस सेंटरसाठी काही नवीन नियम तत्काळ लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व डायलेसिस सेंटरसाठी काही नवीन नियम तत्काळ लागू करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तींना नियमित डायलेसिसची गरज असते, अशा व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून येईल, त्यांच्यासाठी रुग्णालयातील काही भाग पूर्णपणे वेगळा असेल, अशा पद्धतीची व्यवस्था तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यानुसार पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय, सैफी रुग्णालय, नानावटी रुग्णालय अशा ५ रुग्णालयांमध्ये अशी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पडताळणी दरम्यान काही लक्षणे आढळून आल्यास, त्यांना कोरोना बाधितांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या रुग्णालयात, केंद्रामध्ये उपचारार्थ तत्काळ पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.