मुंबई :कोरोना महामारीच्या विळख्यातून आता कुठे आपण थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो होतो. तितक्यात कोविड-19ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोविड-19मुळे एकाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला होता, त्या मृत्यूची बुधवारी अधिकृत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे मुंबईत आहेत. मुंबईत एकूण 43 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 34 आणि ठाण्यात 25 आहेत. रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
14 नवीन कोविड रुग्ण : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती 75 वर्षीय व्यक्ती असून त्याला दीर्घकालीन लिव्हर कार्सिनोमा झाला होता. यात महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीला कोविड-19 ची लागण झाली होती. परंतु कोरोनाचा संसर्ग होणे हे त्याच्या मृत्यूचे प्राथमिक कारण नव्हते. यामुळे आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. कारण संपूर्ण जून आणि जुलैमध्ये कोविडमुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. अशात बुधवारी राज्यातून 14 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या चाचण्यांची संख्या देखील खूप कमी आहे.