मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना, अधिसूचना लागू झाली आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील खाटा अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी बुधवारपासून यंत्रणा कार्यान्वित होणार असून येथे दिवसाला ३५० चाचण्या करता येतील. आज(सोमवार) मुंबईत नवे ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई शहरामध्ये ३ तर, नवी मुंबईत एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळेच राज्यभरातील कोरोणा रुग्णांची संख्या आता 37 झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
केईएम रुग्णालयात दिवसाला २५० चाचण्या होतील, अशी यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. सोबतच १५ ते २० दिवसात जेजे रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुणे येथील बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल यासोबतच आता पुरातन वस्तू संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलाव्यात, असे आयोगाला कळविण्यात आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात सध्या ३७ रुग्ण आढळून आले आहेत. संशयित रूग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या काही दिवसात राज्यभरातील धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि संसर्ग टाळण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. गरजेनुसार प्रवास करण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी निजर्तुंकीकरण करण्याकरता संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये आवश्यकता भासल्यास कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी ४५० व्हेंटिलेटर स्वतंत्ररित्या ठेवण्यात आले आहेत. गरज पडल्यास खाजगी रुग्णालयाकडून व्हेंटिलेटर घेण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सेव्हन हिल रुग्णालयात ७ देशातून आलेल्या प्रवाशांचे क्वारंटाईन केले जाते. याठिकाणी सुमारे १ हजार खाटा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पोलीस यंत्रणादेखील तैनात करण्यात आली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ज्या अडचणी आहेत, त्या सोडविण्याचे निर्देश मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. या रुग्णालयात विलगीकरणासाठी ८० खाटा असून तिथे अजून १२५ खाटा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत दिवसाला १०० चाचण्या होतात, ती संख्या वाढवून आता अधिकचे २५० चाचण्या होतील, असा सेटअप येथे उभारण्यात येत आहे. बुधवारपासून या प्रयोगशाळेत दिवसाला ३५० चाचण्या होतील, अशी क्षमता निर्माण करण्यात आली आहे.
केईएम रूग्णालयात देखील बुधवारपासून २५० चाचण्या होतील, अशी यंत्रसामग्री बसविण्यात येणार आहे. कोरोनासाठीच्या चाचणीकरता प्रयोगशाळांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. जेजे रुग्णालय, हाफकीन इन्स्टिट्यूट, बीजे वैद्यकीय महाविद्यालय येथे १५ ते २० दिवसात प्रयोगशाळा सुरू केल्या जातील. कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या रुग्णांना वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, वायफाय पुरविण्यात येत आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिसांच्या माध्यमातून वाहन चालकांची केली जाणारी ब्रीथ अॅनालायजर चाचणी थांबविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. परवा रात्री पिंपरी चिंचवड येथील ५ आणि औरंगाबाद येथील १ रुग्ण कोरोनाबाधित आल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली होती. तर, आज मुंबईत ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई शहरात ३ तर, नवी मुंबईत एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळेच राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या 37 झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
औरंगाबाद मधील रुग्णालयात भरती असलेल्या ५९ वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तर, राज्यात आज ९५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १५ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ हजार ५८४ विमानांमधील १ लाख ८१ हजार ९२५ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १०४३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७५८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ६६९ जणांचे प्रयोगशाळा नमूने निगेटिव्ह आले आहेत. तर, ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये ७५ संशयित रुग्ण भरती आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोविडबाधित रुग्णांचा तपशील -
पिंपरी चिंचवड मनपा - ८ रुग्ण, पुणे - ७, मुंबई - ५, नागपूर - ४, यवतमाळ - २, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण ३२ रुग्ण आहेत. राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्याअनुसार या अधिनियमाच्या खंड २, ३ व ४ नुसार महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिनियमानुसार कोव्हीड-१९ उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासाठी आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक आरोग्य सेवा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात या उद्रेक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी त्यांना विशेषाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
या अधिसूचनेनुसार,