मुंबई -अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून राज्यातील विद्यापीठांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठ आणि त्यांच्या कुलगुरुंनी तयार केलेला फोर्म्युला यावरच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर या परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायच्या यासाठी आज राज्यातील विद्यापीठांमध्ये व्यवस्थापन परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले. मात्र, त्यात अनेक ठिकाणी तोडगा न निघाल्याने या परीक्षांविषयी सरकारची येत्या काळात मोठी गोची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
#Corona Effect : अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून विद्यापीठांमध्ये संभ्रमाचे वातावरण
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन कुलगुरू समितीने तयार केलेल्या अहवालावर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी काल (शुक्रवारी) अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ही परीक्षा घरातूनच कशी घेता येईल, यासाठीचे काही पर्यायही सांगितले हेाते.
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन कुलगुरू समितीने तयार केलेल्या अहवालावर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी काल (शुक्रवारी) अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ही परीक्षा घरातूनच कशी घेता येईल, यासाठीचे काही पर्यायही सांगितले हेाते. त्यासोबतच कुलगुरू समितीने तयार केलेला अहवाल आपण राज्यातील प्रत्येक विद्यापीठांना पाठविला आहे. त्याचा अभ्यास करुन परीक्षा कशा घ्यायच्या यासाठीचा अंतिम निर्णय हा सोमवारी दुपारपर्यंत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले होते. या परीक्षा कशा घ्यायच्या? याच्या गाईडलाईन्स तयार करुन निर्णय घेण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या होत्या. तसेच या परीक्षांसाठी त्यांनी ऑनलाईन परीक्षांसोबतच ऑफलाईन, ओपनबूक, असायनमेंट बेस असे चार प्रकार देण्यात आले आहेत. त्याची निवड आपल्या सोयीनुसार विद्यापीठांनी करुन त्याचा निर्णय घ्यायचा, अशा सूचनाही सामंत यांनी शुक्रवारी दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) राज्यातील विद्यापीठांनी आपल्या व्यवस्थापन परिषदेसोबत परीक्षा प्राधिकरणाच्या बैठका घेऊन परीक्षाच्या पर्यायांवर विचारविनिमय केला असल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील पुणे, मुंबई या दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता बहुतांश विद्यापीठांकडे ऑनलाईन आणि इतर प्रकारच्या परीक्षा आयोजित करून त्या घेण्याची यंत्रणा नसल्याने विद्यापीठे संभ्रमात सापडले आहेत. त्यातच आज (शनिवारी) मुंबई विद्यापीठाच्याही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षा कशा घ्यायच्या यासंदर्भात एकमत झाले नाही. यासाठी आम्हाला आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती विद्यापीठातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्राकडून देण्यात आली.