मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून यासंदर्भात समिती गठीत करण्यात यावी, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांची बैठक आयोजित करण्यात आली.
कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी -
खुल्या बाजारातून मिळणारा सेस हाच बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु शासनाच्या नियमन मुक्तीच्या धोरणामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊन अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्यावतीने यावेळी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक असून या सर्व अडचणी आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी सहसंचालक पणन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी आणि या समितीने कालमर्यादेत आपला आहवाल शासनाकडे सादर करावा. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्र बर्ड फ्ल्यूपासून अजून तरी दूर; नागरिकांनी काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला