मुंबई - उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता आज (मंगळवारी) सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. दत्ता यांचा शपथविधी संध्याकाळी राजभवनवर होणार आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत रहाणार आहेत. या शपथविधीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार आहे.
यासोबतच मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. याच प्रस्तावात मुख्यमंत्री ठाकरेंना विधान परिषदेचे सदस्य बनवण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद या दोघांपैकी एका सभागृहाचे सदस्य बनणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्याचा कालावधी पुढील महिन्यातील २८ मे रोजी संपत आहे.