मुंबई - महाविकास आघाडी साकारण्यात अहमदभाईंचा सिंहाचा वाटा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अहमद पटेल आयुष्यभर संघटनेसाठी झटले, असे शरद पवार यांनी तर अहमद पटेल यांच्या जाण्याने एक युग संपले. दंतकथा म्हणून ते कायम चर्चेत राहतील, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. काँग्रेसचे नेते व खासदार अहमद पटेल यांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी मान्यवर बोलत होते.
महाविकास आघाडी साकारण्यात अहमदभाईंचा सिंहाचा वाटा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते राज्यसभा खासदार अहमद पटेल यांची शोकसभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी आठवणांनी उजाळा दिला.
अहमदभाईंचे योगदान मोठे -
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते राज्यसभा खासदार अहमद पटेल यांची शोकसभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी आठवणांनी उजाळा दिला. अहमद पटेल म्हणजे सतत कामात व्यस्त असणारा माणूस, अशी माणसं शोधून सापडत नाहीत. त्यांनी २६ व्या वर्षी पहिली निवडणुक लढवली, शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले पण कधीच मंत्री करा, अशी मागणी केली नाही. त्यांनी स्वतःला पक्षासाठी वाहून घेतले होते, माझा पक्ष अधिकाधिक मजबूत कसा होईल, तो पक्ष कसा रुजेल यातच त्यांना जास्त रस होता, अशी माणसे विरळाच असतात. महाराष्ट्रातील राजकारणात अहमद पटेल यांच्यामुळेच तीन पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडी आकारास येण्यास अहमदभाईंचे योगदान मोठे आहे, त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त केल्या.
सतत संघटनेचाच विचार -
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, १९८४ साली राजीव गांधी यांच्याबरोबर काही तरुण चेहरे दिसत होते त्यात अहमद पटेल हे दिसत. उभं आयुष्य त्यांनी संघटनेसाठी काम केले. सतत संघटनेचाच विचार त्यांच्या मनात असायचा. युपीएचे सरकार केंद्रता असताना दहा वर्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. युपीए सरकारच्यावेळी काही समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी यांच्यावतीने, मनमोहनसिंग यांच्यावतीने ते जबादारी पार पाडत असत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. दहा वर्ष मनमोहसिंग यांचे सरकार हे सरकार कसे टिकेल, सर्व पक्षात सामंजस्य कसे टिकेल, मार्ग कसा काढता येईल याची जबाबदारी अहमदभाईंवर असायची. सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांचा स्वभाव, कल हा संघटनेसाठी काम करण्याकडे होता.
आघाडीचे सरकार साकारण्यात महत्वाची भूमिका -
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार साकारण्यात अहमद पटेल यांची भूमिका महत्वाची होती. शेवटच्या क्षणात त्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हे सरकार स्थापन झाले. अहमदभाई यांची प्रचंड स्मरण क्षमता होती. देशांतील सर्व राज्यातील राजकीय नेत्यांची जाण, माहिती अहमदभाईंना होती. पडत्या काळात काँग्रेस पक्षाची उंची वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची ताकद त्यांच्यात होती. महाविकास आघाडीला ते कायम मार्गदर्शन करत आले. अहमद पटेल जाणे म्हणजे एक अध्याय संपला. दंतकथा म्हणून भाई कायम चर्चेत राहतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
सरकारला वाचवणारा महान नेता -
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी घडविण्याचे काम अहमद पटेल यांनी केले. तर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, १९९२ साली जनरल सेक्रेटरी म्हणून केंद्रीय राजकारणात लक्ष द्यायला सुरू केले. त्यावेळेस नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांच्यातील दुवा हे अहमद पटेल होते. सरकार निर्माण करणारा, सरकारला वाचवणारा महान नेता पटेल होते. अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेत मंत्री अमित देशमुख यांना आठवणी सांगताना कंठ दाटून आला. अहमद पटेल यांचे विलासराव देशमुख अत्यंत निकटवर्तीय संबंध होते. माझे वैयक्तिक मोठे खूप नुकसान झाले असे मी मानतो असे अमित देशमुख म्हणाले.
स्वत: कधी मंत्री झाले नाहीत -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहमद पटेल यांचे अचानक दुख:द निधन सर्वांना धक्का देणारे आहे. देशांतल्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान होते. माझी त्यांच्याशी दोनवेळा भेट झाली होती, अतिशय साधेपणाने वागणे, बोलणे होते. ज्यांनी अनेक मंत्री सीएम बनवले पण ते स्वत: कधी मंत्री झाले नाहीत. पक्ष संघटन बांधणीकडे कायमच लक्ष दिले. अनेक पक्षात मंत्री होणारे असतात पण पाठीमागे राहत काम करणारे अहमदभाई सारखे कमी असतात.