मुंबई-राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारतर्फे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आज (मंगळवार) सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील आरोग्य पथकाने त्यांच्या वांद्रे पूर्व येथील मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्य तपासणी केली.
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात आठ कोटींपेक्षा जास्त लोकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कुटुंबांना सुरक्षित ठेवणारी ही मोहीम केवळ शासकीय नसून लोकचळवळ असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.