मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर आता देशभरातून कौतुकाचा पाऊस पडू लागला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'ऑलिम्पिकमधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे. भालाफेकीसाठी नीरजच्या मन आणि मनगटात विश्वासाची, समर्थ साथ यांची ताकद भरणाऱ्या त्याच्या कुटुंबियांसह, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रा याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
नीरजने शानदार सुवर्णपदकाने नवा इतिहास लिहिला - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. 'टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल नीरज चोप्रा याचे मनपूर्वक अभिनंदन! भारतीय ॲथेलेटिक्समध्ये त्याने या शानदार सुवर्णपदकाने नवा इतिहास लिहिला आहे!', असे शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांचे वडिल शरद पवार यांची ट्विट रिट्विट केले आहे.
नीरजनं इतिहास रचला- अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. 'टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मी. भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं मनःपूर्वक अभिनंदन! देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजनं आज इतिहास रचला आहे. त्याच्या कामगिरीनं देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे', असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अंगावर रोमांच - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. 'अंगावर रोमांच! राष्ट्रगीत आणि भावनांचा तो सूर, चमकणारे सोन्यासारखे नीरजचे डोळे... 1.3 अब्ज भारतीयांना नीरजचा अभिमान', असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच, सुवर्णपदक जिंकल्यानंतर राष्ट्रगीत झाले. याचा व्हिडिओही फडणवीसांनी ट्विट केला आहे.
नीरजची ऐतिहासिक कामगिरी