मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या ‘100 कोटी वसुली’ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. देशमुख यांच्याविरोधातील 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआय तपासातील पहिल्या आरोपीला आज (रविवारी) अटक करण्यात आली आहे. संतोष जगताप नावाच्या मध्यस्थाला सीबीआयने ठाण्यातून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
चार दिवसांची सीबीआय कोठडी -
यापूर्वी सीबीआयचा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली होती. आरोपी संतोष जगतापला आता सीबीआयने अटक केली असून त्याला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
कथित 100 कोटी वसुलीचे आरोप, ईडीची छापेमारी
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत. मुंबई पोलिस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे याने सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडे मोठे खुलासे केल्याचे सांगण्यात येत आहे.
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले होते की, अनिल देशमुख एपीआय सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिले होते. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.