मुंबई : मुंबईत सीबीआयने मोठी करवाई केली आहे. CGSTकर चुकवेगिरी विरोधी विभागात अधीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. धिरेंद्र कुमारविरोधात एक कोटींची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने धीरेंद्रकुमार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय याप्रकरणी तपास पुढे करत आहे.
नेमके काय आहे प्रकरण? :याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, धिरेंद्र कुमार आणि त्याच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुंबईतील श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. या व्यापाऱ्याला केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) मुंबई कार्यालयात नेऊन तेथे पाच तास बसवून ठेवले. त्यानंतर त्याला अटक करण्याची धमकी देत त्याच्याकडून एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान अधिकारी लाच मागत असताना अधिकाऱ्यांचे बोलणे व्यापाऱ्याच्या मित्राने मोबाईलवर रेकॉर्ड केले. हीच रेकॉर्डिग सीबीआयला दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे. सीबीआयला दिलेल्या या व्हिडिओ तसेच संबंधित व्यापाराला पाठवलेल्या समन्सवर असलेली धीरेंद्र कुमारची सही आणि व्यापारासोबत कार्यालयात येतानाचे सीसीटीव्ही फुटेज अशा अनेक गोष्टींची पडताळणी करून सीबीआयने धिरेंद्र कुमार यांच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
अशी झाली होती सेटलमेंट : अटक टाळायचे असेल तर एक कोटी दे आणि तेही आत्ताच दे अशी मागणी धीरेंद्र कुमारने केली होती. परंतु ताब्यात असलेल्या सोने व्यापाराने कसेबसे त्याच्यासोबत 50 लाख रुपयांपर्यंत सेटलमेंट केली. 50 लाखांपैकी 25 लाख आता दोन तासात देतो आणि उरलेले 25 लाख उद्या सकाळी देईन, असे सोने व्यापाऱ्याने धीरेंद्र कुमारला सांगितले. यासर्व पैशांची व्यवस्था करण्यासाठी सोने व्यापाराने एका मित्राला फोन करून सांगितले. व्हाट्सअपद्वारे सोने व्यापाऱ्याने आपल्या मित्राला फोन करून पैशाची व्यवस्था करून धीरेंद्र कुमारला देण्यास सांगितले.
असे दिले पैसे : चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ एक करड्या निळ्या रंगाची बाईक उभी असेल तिचा नंबर MH 01,EG 1023 हा असेल या बाईकवर दोन जण असतील, त्या दोघांकडे पैशांची बॅग द्यायची आणि निघून जायचे त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सूचना अधीक्षक धिरेंद्र कुमार याच्याकडून देण्यात आल्या होत्या. 25 लाख रुपयांचा पहिला आत्ता घेऊन बाईक स्वार तिथून ताबडतोब निघून गेले.दरम्यान या प्रकरणाचा तपास केला असता या गुन्ह्यात अँटॉप हिल परिसरातील ज्वेलर्स दुकानाचा मालक आणि त्याच्या दुकानातील कामगार सहभागी होता. अमृतपाल संखाला असे ज्वेलर्स दुकानदाराचे नाव आहे तर बबल असे कामगाराचे नाव आहे. हेच ते दोघे पैसे घेण्यासाठी बाईकवरुन चर्चगेट रेल्वे स्थानकावर आले होते,अशी माहिती सीबीआयला मिळाली आहे.